कोसला पुन्हा एकदा......चार वर्षांनंतर आज कोसला परत वाचलं...परत मला ते "माझं" वाटलं...म्हणजे एखादी व्यक्ती अस्सं इतकं आपल्या जीवनाबद्दल कस्सं लिहु शकते? ते पण काहीही ओळखं नसताना?तशी चार वर्षांमध्ये माझ्या ऎहीक आणि वैयक्तिक जीवनात फ़ार फरक पडलाय असं नाही...हो एक मात्र नक्की अनुभवाबद्दल बोलायचं झालं तर तीच काय ती कमाई...
माझी ओळख वाचक म्हणुन नाही हे आधीच मान्य केलयं. त्यामुळे वाचनाचा वेगही साधारणचं. पण आज चक्कं सलग दोन बैठकीत ह्या पुस्तकचा फडशा पाडला...कारण आज मला न जाणो का हे अधिकच माझ्या जीवनाबद्दलचं वाटलं म्हणुन असेल कदचित...
सांगवीकर हा थोरच..
मी माझ्या मित्रांना नेहमी म्हणतो, कि मेरी जिन्दगी खुली किताब है (तसा काहिंना हा आक्षेपार्ह मुद्दा वाटतोच) पण मनातील गुंता कोणाला सांगता येत नाही..तो एक तर अनुभवावा तरी लागतो नाही तर विसरावा तरी...ह्याच गुंत्याच्या अनुभवाचे दर्शन मला परत सांगवीकरांकडुन झाले.
उदाहरणार्थ, समोरच्यावर कारण (आणि विषेशतः स्वभाव) नसताना चिडणे, जुन्या नात्यांना उगाच फाटे फोडणे, जवळच्या मित्रावर तो चांगला आहे हे माहित असुनही वैतागणे, नव्या ओळखीला जवळ करुन नको तेवढा विश्वास करणे वैगेरे ह्या त्याच्या गोष्टी त्याच्या की माझ्या ???.
वेळापत्रक तयार केलं, पाच महिन्याचा अभ्यास दीड महिन्यात...ह्या वाक्यासाठी पांडोबाला माझं वैयक्तीक Nobel केव्हाच मिळालंय...
समजातील हलाहल आणि मनातील चलबिचल ह्या एकमेकांना इतक्या कशा पोषक ठरव्या??? खोल कोपऱ्यातील दुःख असं मुसंडी मारुन का परत जीवनात डोकवतं? आणि प्रत्येक खेपेला अधिक त्रासदायी का बनतं?काहि प्रश्न असे अनुत्तरीतच का रहावे?
होस्टेल वरचे तर कितीतरी विचार (मी कधी काळी न लिहिलेल्या) माझ्या डायरीतुन उचलले वाटतात. ही डायरी अजुन एक थोर । माझ्या एका Non-मराठी मित्राला हे मी सांगीतले, तर तो म्हणाला, उसमे क्या है? चेतन भगत की बुक मे भी वही है....पण मला माहित आहे चेतन नामक स्व-घोषीत कादंबरीकाराने केवळ घटना नोंदविल्या आहेत. इथे तर मनाचा बाजार मांडला आहे. असो.
हे लिखाण केवळ एका ठिकाणी(म्हणजे माझ्या मनाशी संलग्नता साधताना) मार खाते,शेवटाला...
न जाणो का पांडु नियतीला शरण जातो..निदान तशी वाटचाल तरी करायला लागतो. अनुभवातुन आणि परस्थितीतुन अर्जित केलेलं ज्ञ्यान एकीकडे ठीक आणि त्यातुन प्रगल्भ बनुन जीवनच्या नवीन वाटा ढुंढाळणं पन ठीक. पण ह्यापैकी कोणतिही एक किंवा दोन्ही गोष्ट काहि नियतीच्यासमोर पांढरे निशाण उभारण्याचे कारण होवु शकत नाहीच. तेव्हा सांगवीकर आणि माझ्यातला फरक तिथेच.
असे असुनही ही कलाकृती माझ्या Favorite books पैकी झाली आहे हे वेगळे सांगावयास नकोच. लेखक मला ओळखत नाही, माजे जीवन त्यांना माहित नाही. पण त्यांना एकंदर जीवन कळाले आहे म्हणुन ही श्रेष्ठ निर्मिती. अशा कलाकृतीला आणि साहित्यिकाला सलाम.!!!